पोलीस ठाण्यासमोरील घरफोडीची उलक होईना

Spread the love

पाच दिवस उलटूनही तपास ‘शून्य’!चोरट्यांना राहीला नाही जरब; पोलिसांनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) :

शहरातील ऐन पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषसिंग ठाकूर यांचे घर फोडून सुमारे सव्वा लाखांची रोकड चोरट्यांनी पळवून नेल्याच्या घटनेला ५ दिवस लोटले आहेत तरी या चोरीच्या घटनेची साधी उकलही पुर्णा पोलिसांना करता आली नसल्याने आता पूर्णा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणखी मोठे प्रश्नचिन्ह उभारले असून,पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घर सुरक्षित नाही, तर शहरातील सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची हमी कुणाकडे मागायची? असा संतप्त सवाल आता पूर्णेकर विचारत आहेत.

      पुर्णा पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील रस्त्यावर माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषसिंग ठाकूर यांचे घर आहे.त्यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत घरातील कपातील सुमारे १ लाख २५ हजार रुपये लंपास केले.घटनेची माहिती ठाकूर यांचे मुलगि पुजा ठाकूर यांनी पुर्णा पोलीसांना दिली.७ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध पुर्णा पोलिसांनी  गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली.ऐन पोलिसांच्या नाकाखालीच चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा उधाण आले होते.ही घटना  पोलीस ठाण्याच्या समोर असल्याने पोलिस तपास वेगाने करुन चोरट्यांना जेरबंद करतील अशी आशा पुर्णेकरांना होती. मात्र या प्रकरणी पोलिसांनी मागील ५ दिवसांत या घटनेची उकल करता न आल्याने नामुष्कची वेळ आली असल्याची चर्चा आता शहरात जागोजागी ऐकायला मिळत आहे,

       चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर घर फोडण्याचे धाडस केले, ही घटना केवळ घरफोडीची नाही; ती पूर्णा पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेलाच दिलेली उघड चुनौती आहे. रात्रगस्त नेमकी कुठे होती? सीसीटीव्ही कॅमेरे काय टिपत होते? तांत्रिक तपास कुठपर्यंत पोहोचला? संशयितांची धरपकड झाली का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर तरी या घरफोडीचे गूढ उलगडणार का,की ‘चोर मोकाट-तपास शून्य’ अशीच पूर्णा पोलिसांची कारकीर्द सुरू राहणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

  एसपींनी ‘पूर्णा पॅटर्न’चा पंचनामा करावा!

या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून पूर्णा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज आहे. चोरीच्या या गुन्ह्याचा तपास कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, आतापर्यंत काय कारवाई झाली, सीसीटीव्ही फुटेज तपासले का आणि संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा वरिष्ठ पातळीवरून जाब विचारला पाहिजे.पोलिसांच्या दारातच चोरट्यांनी डल्ला मारला आणि पाच दिवसांत पोलिसांना चोरट्यांचा ठावठिकाणा मिळू नये, हा योगायोग मानायचा की तपास यंत्रणेचे अपयश?आता ‘तपास सुरू आहे’ या ठरावीक उत्तराने नागरिकांचे समाधान होणार नाही. चोरटे कधी पकडणार, याचे उत्तर हवे! कारण चोरटे मोकाट राहिले तर उद्या कोणाचे घर फोडले जाईल, याची खात्री कुणी देणार?

You cannot copy content of this page