Hingoli Collector;औंढा नागनाथ तालुक्यात विकासकामांची पाहणी

Spread the love

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, वीज उपकेंद्रासह विविध ठिकाणी भेट; एसआयआरच्या कामाचाही घेतला आढावा

हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) :

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी औंढा नागनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय कार्यालये, विकासकामे आणि सार्वजनिक सुविधांची पाहणी केली. ग्रामीण रुग्णालय, तालुका क्रीडा संकुल, महावितरणचे वीज उपकेंद्र, तहसील कार्यालय तसेच चिमेगाव-पेरजाबाद रस्त्याची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा वेळेत आणि प्रभावीपणे मिळाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यानंतर त्यांनी शहरातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या कामाचा आढावा घेतला. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, पुनरीक्षणाची प्रगती आणि संबंधित कार्यवाहीबाबत माहिती घेऊन पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.तालुका क्रीडा संकुलाची पाहणी करताना मैदानाची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि खेळाडूंना मिळणाऱ्या सोयींची माहिती त्यांनी घेतली. स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

महावितरणच्या वीज उपकेंद्राची पाहणी करून वीजपुरवठ्याची स्थिती आणि उपकेंद्राच्या कार्यप्रणालीची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.तहसील कार्यालयातील सुरू असलेल्या हॉलच्या कामाची पाहणी करून कामाची सद्यस्थिती आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. याच ठिकाणी सुरू असलेल्या एसआयआरच्या कामाचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.चिमेगाव ते पेरजाबाद रस्त्याची पाहणी करून रस्त्याची अवस्था आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती त्यांनी घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार हरीश गाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page