साडेपाच कोटींच्या फसवणुकीचा ‘मास्टरमाईंड’ मोकाटच!
पुर्णेतील एरंडेश्वरच्या १५० शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे प्रकरण; गुन्हा दाखल होऊन २४ दिवस उलटले तरी पोलिसांना ठग सापडेना
पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) :
एरंडेश्वर येथील शेतकऱ्यांना तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या भुसार व्यापाऱ्याचा शोध घेण्यात येथील पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांचा ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल उचलून पैसे न देता पसार झाल्याप्रकरणी १८ जुलै रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊन तब्बल २४ दिवसांचा कालावधी उलटूनही मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तपासाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील शेख हमीद शेख सरू बालेसाब व शेख सरू शेख बालेसाब या पितापुत्रांनी परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर भुसार माल खरेदी केला. हळद, सोयाबीन, हरभरा, गहू आणि तूर असा सुमारे ६ हजार ८०० क्विंटलहुन अधिक शेतमाल शेतकऱ्यांकडून उचलण्यात आला. मालाचा व्यवहार झाल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि अखेर व्यापारी पसार झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणात शेतकऱ्यांनी पुर्णा पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता आरोपीचा शोध घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र, गुन्हा दाखल होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपीचा मागमूसही लागला नसल्याने ‘सुमारे साडेपाच कोटींच्या फसवणुकीचा तपास एवढा संथ गतीने का?’ असा सवाल एरंडेश्वरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कोट्यवधींच्या या प्रकरणातील आरोपीला तातडीने जेरबंद करून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली रक्कम वसूल करण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
——————
वाहनांचे नंबर जाहीर; आरोपी मात्र अद्याप बेपत्ता!
दरम्यान, या प्रकरणात वापरण्यात आलेल्या तीन वाहनांचे क्रमांक जाहीर करून ती वाहने पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन परभणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे. पोलिसांनी वाहनांचा शोध घेण्यासाठी जाहीर प्रकटन काढले असले तरी, ज्या व्यापाऱ्यावर शेकडो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे, त्याच आरोपीपर्यंत तपास यंत्रणा अद्याप पोहोचलेली नाही.मुख्य आरोपीपर्यंत पोहोचणे आणि शेतकऱ्यांचा पैसा व शेतमालाचा माग काढणे हेच पोलिसांसमोरील खरे आव्हान आहे.
____________________
शेतकऱ्यांचा माल गेला; आता तपासही ‘थंड’?
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल व्यापाऱ्याने उचलून नेला. माल विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशांवर अनेक शेतकऱ्यांचे पुढील हंगामाचे नियोजन अवलंबून होते. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या या कथित फसवणुकीनंतर आरोपी फरार आणि शेतकरी आर्थिक संकटात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.











