Digital Arrest;शेतकरी दाम्पत्यास १९ लाखाला लुटले

Spread the love

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील बनवस येथील घटना;पालम पोलीसांत गुन्हा दाखल

परभणी,ता.२८/प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांनी परभणी जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ माजविला असून डिजिटल अरेस्टचे जाळे आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकरी दांपत्याला डिजिटल अरेस्ट करून सायबर चोरट्यांनी तब्बल १९ लाख ५६ हजार रुपयांना गंडविल्याची घटना बुधवारी(दि. २६) उघडकीस आली आहे.

चंद्रशेखर माधवराव लांडगे (वय ५२) रा. बनवस ता. पालम असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर लांडगे यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांत दोघा अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर लांडगे यांना मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअपवर या डिजिटल माध्यमावर व्हिडिओ कॉल आला. या कॉलवर आरोपींनी, तुमच्या खात्यातून आतंकवाद्यांना आर्थिक फंडिंग झाले असल्याचे सांगून तुम्हास डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, अशी फिर्यादी चंद्रशेखर लांडगे व त्यांच्या पत्नीस भीती घातली. त्यानंतर मोठ्या आर्थिक रकमेची मागणी केली. घाबरलेल्या लांडगे दांपत्यांनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर १९ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे भरणा केले. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादी दांपत्याच्या लक्षात आले. यावरून तब्बल एक वर्षानंतर फिर्यादींनी पालम पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक चिट्टेवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात मागील एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत डिजिटल अरेस्टच्या तीन घटना पुढे आल्या आहेत. घटनेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक पुढे आली आहे. पालम तालुक्यातील ही घटना ग्रामीण भागातील एका शेतकऱ्यास लुटल्याची असल्याने सायबर चोरट्यांचे जाळे आता परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातही पोहोचल्याचे स्पस्ट होत आहे. असे असूनही पोलिसांच्या वतीने मात्र डिजिटल अरेस्ट आणि या प्रकरणी झालेल्या आर्थिक फसवणुकीबाबत काय उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबत कुठलीही माहिती पुढे आली नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात डिजिटल अरेस्ट होण्याच्या घटनांना आळा बसणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


You cannot copy content of this page