नानलपेठ पोलीस ठाण्याचा पदभार विलास गोबाडे यांच्या कडे!

Spread the love

जिल्हा पो.अ.पंकज कुमावत यांचे आदेश;नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पोनि. गणेश कदम यांच्या जागी विश्वंभर गोबाडे,यांची नियुक्ती

परभणी, ता. १ (प्रतिनिधी) : नानलपेठ पोलिस ठाण्यातील कारभारात मोठे फेरबदल करण्यात आले असून, वादग्रस्त पो.नि. गणेश कदम यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलिस नियंत्रण कक्षातील पो.नि. विलास गोबाडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वर्धा येथून आलेले पोलिस निरीक्षक अमोल मंडाळकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचीही नानलपेठ पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी याबाबत आदेश काढले आहेत.

नानलपेठ पोलिस ठाण्यातील गणेश कदम यांचा कार्यकाळ विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्याची चर्चा होती. त्यांच्या कार्यकाळात परिसरात गुन्हेगारी, अवैध व्यवसाय तसेच पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. गुन्हेगारांवर पोलिसांचा अपेक्षित वचक राहिला नसल्याचीही नागरिकांची भावना होती.

पशुधन चोरीच्या काही प्रकरणांमध्ये आरोपींना पाठीशी घालण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये आरोपींची संख्या कमी करण्यात आल्याची चर्चा असून, त्यासंदर्भात आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपांबाबतही नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर छापेमारी करून गुन्हे दाखल केले होते. वरिष्ठांच्या पथकाला आढळून आलेले अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास कसे आले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर नानलपेठ पोलिस ठाण्यातील कारभारात बदल करण्यात आल्याची चर्चा असून,पोलिस निरीक्षक गणेश कदम यांची सायबर सेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


इतर पोलिस अधिकारीही रडारवर?

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी वरिष्ठांकडे तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर वरिष्ठांचे लक्ष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्त्यांबाबत अचानक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नानलपेठ पोलिस ठाण्यात झालेल्या या बदलाकडे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनातील पुढील संभाव्य फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष वेधले जात आहे.

You cannot copy content of this page