गोदापात्रात महाकाय मगरीची एन्ट्री;पुर्णा-पालम तालुक्याच्या सीमावर्ती गावांत खळबळ
होडीचालक व मच्छीमारांना प्रत्यक्ष दर्शन; देऊळगांव(दु)-उंबरखेडी परिसरात खळबळ, वनविभागाला तातडीची सूचना
पूर्णा/पालम, ता. १ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
पूर्णा व पालम तालुक्याच्या सीमेवरील देऊळगाव (दु.)-उंबरखेडी परिसरातील गोदावरी नदीपात्रात रविवारी (ता. ३०) महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने सीमावर्ती गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नदीत होडी चालविणाऱ्या नावाड्यासह मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना ही विशाल मगर दिसून आली. अचानक झालेल्या मगरीच्या दर्शनाने नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाकडून मगरीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
देऊळगाव (दु.) येथील नावाडी संतोष प्रभू पारसे हे गोदावरी नदीतून देऊळगाव व पालम तालुक्यातील उंबरखेडी येथील नागरिकांना होडीतून ये-जा करण्यासाठी मदत करीत होते. रविवारी नदीपात्रात होडी चालवत असताना संतोष पारसे यांच्यासह मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांच्या नजरेस पाण्यात एक महाकाय मगर पडली.विशाल मगरीचे दर्शन होताच नावाडी व मच्छीमारांमध्ये एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत संतोष पारसे व इतर मच्छीमारांनी तातडीने नदीकाठ गाठला. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील शिवाजीराव दुधाटे यांना देण्यात आली.माहिती मिळताच पोलीस पाटील दुधाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची तातडीने माहिती देण्यात आली. मगरीचा शोध घेण्यासाठी सोमवारी वनविभागाचे पथक परिसरात दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पूर्णा तालुक्याला गोदामाईचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. पैठण येथील जायकवाडीपासून ते नांदेडच्या विष्णुपुरी जलाशयापर्यंत गोदावरी नदीवर अनेक उच्चपातळी बंधारे आहेत. त्यामुळे नदीपात्रात विविध जलचर आढळतात. मात्र, देऊळगाव-उंबरखेडी परिसरात प्रत्यक्ष महाकाय मगर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विशेषतः नदीकाठावर जाणारे नागरिक, जनावरे पाण्यासाठी घेऊन जाणारे शेतकरी, मासेमारी करणारे मच्छीमार तसेच होडीतून नदी ओलांडणाऱ्या नागरिकांनी आता विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गोदापात्रात जाऊ नका; सतर्क राहा!-वनविभाग
महाकाय मगर नदीपात्रात असल्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. शक्यतो गोदावरी नदीपात्रात जाणे टाळावे, नदीकाठावर एकट्याने जाऊ नये तसेच मासेमारी व इतर कामांसाठी पाण्यात उतरताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाचे अंगद आयनाळे व राम खंटींग यांनी केले आहे. वनविभागाच्या पथकाकडून मगरीचा शोध घेतल्यानंतर पुढील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
होडीचालक-मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला?
गोदावरी नदीपात्रात मगरीचे दर्शन होताच नावाडी संतोष प्रभू पारसे व मच्छीमारांनी प्रसंगावधान राखून तातडीने नदीकाठ गाठला. वेळीच सतर्कता न दाखविली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी कोणतीही जोखीम न घेता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









