जिंतूरात सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा
-अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी
जिंतूर/प्रतिनिधी
अनुसूचित जाती आरक्षणाचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावा, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. १) जिंतूर शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनुसूचित जातींच्या यादीतील काही घटकांना आरक्षणाचा तुलनेने अधिक लाभ मिळत असून, काही समाजघटकांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे उपवर्गीकरण करताना वंचित घटकांना अधिक संधी देण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण वर्गीकरणाच्या प्रारूपासाठी नियुक्त न्यायमूर्ती बदर समितीने १० मार्च रोजी राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. तरीही अंमलबजावणीबाबत निर्णय झालेला नसल्याने सरकारने तातडीने उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेश घोडे, कॉम्रेड गणपत भिसे, राधाजी शेळके, रघुनाथ कसबे, अशोक उफाडे, संदीप दात्रे, नितीन रोकडे,कु खिल्लारे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील कलवाने यांनी केले. मोर्चा शांततेत पार पडला. पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.









