पूर्णेत चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; महिनाभरात नववी चोरी!

Spread the love

बसस्थानकासमोरील मेडिकलचे शटर वाकवून साडेसात हजारांची रोकड लंपास; आठ घटनांचा अद्याप उलगडा नाहीपोलीसांच्या निष्क्रिय कारभारावर जनतेत उलटसुलट चर्चा

पूर्णा, ता. १ (प्रतिनिधी) : पूर्णा शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, महिनाभरात चोरीची नववी घटना घडल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी शहरात झालेल्या आठ चोरीच्या घटनांचा अद्याप ठोस उलगडा झालेला नसतानाच चोरट्यांनी आता थेट वर्दळीच्या बसस्थानकासमोरील इंडिया मेडिकल स्टोअर्सचे शटर वाकवून कुलूप तोडत ७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढत असताना पोलीस मात्र त्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याची संतप्त चर्चा नागरिकांत सुरू आहे.

एकबाल नगर येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त कर्मचारी शेख रफीक (सर) शेख इस्माईल यांचे पूर्णा शहरातील बसस्थानकासमोरील इंडिया मेडिकल स्टोअर्स आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून शेख रफीक व त्यांचा मुलगा शेख सोहेल घरी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकलचे शटर एका बाजूने उचललेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडत आत प्रवेश केल्याचे दिसून आले. टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ७ हजार ५०० रुपयांची नगदी रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. याप्रकरणी दि. ३१ ऑगस्ट रोजी शेख रफीक यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची मालिका सुरूच; पोलिसांसमोर मोठे आव्हान

पूर्णा शहरात २७ जुलैपासून चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांची झोप उडविली आहे. सिद्धार्थनगरातील शिवगंगा आहिरे, कानडखेड येथील मारोती धोत्रे व मारोती वैद्य यांच्या ठिकाणांसह पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्ष स्व. सुभाषसिंह ठाकूर यांच्या घरात चोरी झाली होती. त्याचबरोबर महावीरनगर परिसरातील संतकृपा ज्वेलर्स, शिवा झेरॉक्स, पलसिद्ध मल्टी सर्व्हिसेस आणि कनिष्ठ ग्राहक सेवा केंद्र यांसह विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या.या घटनांमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, चोरीच्या मालिकेबाबत स्थानिक वृत्तपत्रांतून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अनेक घटनांचा अद्याप उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

गस्त वाढली तरी चोरटे मोकाट?

शहरात रात्रीची गस्त वाढविल्याचा दावा केला जात असला तरी चोरीच्या घटना थांबण्याऐवजी सुरूच असल्याने पोलिसांच्या गस्तीबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. रात्री बाजारपेठ बंद झाल्यानंतर चोरटे दुकाने आणि घरांना लक्ष्य करीत असल्याने पोलीस गस्त नेमकी कितपत प्रभावी आहे? अशी चर्चा शहरात रंगली आहे.महिनाभरात चोरीची नववी घटना घडल्याने पूर्णा शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. यापूर्वीच्या चोरीच्या घटनांचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुन्हे दाखल करून थांबणार की चोरट्यांना पकडणार?’

चोरी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते; मात्र, चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. महिनाभरातील सर्व चोरीच्या घटनांचा तातडीने उलगडा करून आरोपींना जेरबंद करावे, अन्यथा शहरातील नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास आणखी कमी होईल, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page