जिल्हा कचेरीवर धडकला आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा
-राज्यपालांना पाठविले मागण्यांचे निवेदन
परभणी/प्रतिनिधी
राज्यभरातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण, जात पडताळणी, वसतिगृह, शिष्यवृत्ती, रोजगार आणि मूलभूत शैक्षणिक सुविधांसाछी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून येथील शनिवार बाजार परिसरातून विद्यार्थ्यांनी मंगळवारी(दि. १) एल्गार मोर्चा काढला. जिल्हाधिकारीमार्फत राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
शहरातील शनिवार बाजार परिसरातून सकाळी ११ वाजता एल्गार मोर्चा सुरुवात झाली. हा मोर्चा शिवणकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, आरआर टावर, नारायण चाळमार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यानंतर शिष्टमंडळांने जिल्हाधिकारी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन राज्यपालांना पाठविले. या निवेदनात, विद्यार्थ्यांना अडचण निर्माण करणारी कंडिशनल जात प्रमाणपत्र पडताळणी रद्द करावी, पैसा क्षेत्रातील कर्मचा-यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, वस्तीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशाच्या दिनांकपासून थेट निधी हस्तांतरणाचा लाभ द्यावा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास दौरा, प्रकल्प, स्नेहसंमेलन, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक निधीची तरतूद करावी, आदिवासी वस्तीगृहातील विविध कार्यक्रमांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय व अभ्यासिका सुविधा उपलब्ध करावी, जिंतूर येथे आदिवासी मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे आणि वनपट्टे आदिवासींच्या नांवे करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे संतोष धोत्रे, वर्षात ससाने, योगिता बलवंते, प्रसाद गोरे, करण पवार, अनुसया महाले, आकाश राणे, प्रेम घोंगडे, प्रज्ञा अंभोरे, वैशाली निळे, शिवशंकर वाळके, रामदास काळे, सोपान मोरे, संदीप खोकले, दत्ता चाफे, कैलास ठाकरे, आदित्य पोटफोडे, आकाश साबळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.









