परभणी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट गडद
दुष्काळ जाहीर करण्याची विविध पक्ष, संघटनांची मागणी
परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. परिणामी खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून, करपून जात आहेत. मागील महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने कोरड्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी व प्रशासनाला निवेदने देऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यात खरीप हंगामाच्या पेरणीस सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस तुटक व असमान पावसाचे वितरण झाले. तर जुलै महिन्यात अनेक मरसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तुरळक महसूल मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस वगळता पावसाने मोठा खंड दिल्याने संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाशिवाय गेला. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपास, मूग, उडीद, तुर या प्रमुख पिकांचं बागायती पिकेही धोक्यात आली आहेत. अनेक महसूल मंडळात सोयाबीन पीक वाढत्या उन्हाने करपून जात आहे.
पावसाने मोठा खंड दिल्याने परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसाने सरासरी देखील गाठले नाही. ५० टक्के पेक्षा अधिक पावसाच्या तुटीची नोंद घेण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी अजूनही पाऊस नाही. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला आहे. तर दुसरीकडे अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने जिल्हाभरातील जलसाठ्यात देखील पाण्याची आवक झाली नसल्याने जलसाठ्यांत अल्प साठा झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यावर कोरज्यी दुष्काळाचे सावट पसरले आहे.










