आ.सईद खान यांच्या प्रयत्नांना यश;पाथरीच्या पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेजसाठी ३३५ कोटींची मंजुरी
आमदार सईद खान नागरी सत्कार
पाथरी/प्रतिनिधी
पाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश आले असून पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेज योजनेसाठी तब्बल ३३५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाले असल्याची माहिती आमदार सईद खान यांनी दिली. ते येथील एकतानगर रोडवरील फंक्शन हॉलमध्ये शनिवारी(दि. ५) आयेजित जंगी सत्कार सोहळ्यात बोलत होते. या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक एजाज खान व शिवसेना नेते मुजम्मील खान यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष आसेफ खान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मेहराज खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेवक उद्धव नाईक, माजी नगरसेवक शेख इरफान, अमोल भाले उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार खान म्हणाले, पाथरी शहरात १ हजार ५०० नवीन लाईट्स, १ हजार २०० दुकानांचे नियोजन आहे. तसेच मुस्लिम समाजासाठी भव्य शादी खाना, हिंदू समाजासाठी तसेच मागासवर्गीय समाजासाठी मंगल कार्यालये उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










