पूर्णेतील ३ घरफोडयांचा स्था.गु.शाखेने केला पर्दाफाश
परभणी स्था.गु.शाखेची धडाकेबाज कामगिरी;४ वर्षांपासून फरार सराईत चोरटा जेरबंद;१ लाखांचा मुद्देमाल जप्त;
पूर्णा, ता. १८ (प्रतिनिधी) :
शहर व परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत चोरट्यांस परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करत मोठ्या शिताफीने पुर्णा तालुक्यातील मौजे सुकी शिवारातील पारधी वस्तीवर सापळा रचून ताब्यात घेत जेरबंद केले असून, त्याचे जवळून विविध गुन्ह्यात हिश्याला आलेले सुमारे १ लाख रुपये जप्त केले आहेत. अशोक उर्फ बहादूर विठ्ठल भोसले (वय२५) रा. सुकी, ता. पूर्णा, जि. परभणी असे ताब्यात घेतलेल्या चोरट्यांचे नांव असून, त्याने पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतील कौडगांव, पंचशीलनगर सिद्धार्थ नगर येथिल घरफोडी केलेल्या तीन गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने, अपर पो.अ. तानाजी चिखले व स्था.गु.शा. पो.नि.गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखेचे फौजदार चंदनसिंह परिहार व मधुकर चट्टे,स.पो.उप.नि. सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोहेकाॅ. महेश कवठाळे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, राहुल परसोडे, माणिक वाघ, पो.शि. हनुमान ढगे, दिलीप निलपत्रेवार हे मागील काही दिवसांपासून पूर्णा पोलीस हद्दीतील घडलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांतील चोरट्यांच्या मागावर होते.गुरुवारी (ता.१७) रोजी पथकास सदरील गुन्ह्यातील पसार झालेला बहादुर भोसले हा सुकी शिवारातील पारधी वस्तीवर असल्याची कुणकुण लागताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन,पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सहका-यांसोबत मिळून पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर येथील शिवगंगा नागोराव आहिरे यांचे घर फोडून पळवलेल्या साडेपाच लाखांचा मुद्देमाल, पंचशील नगरातील शबाना बेगम रहीम,यांचे घर फोडून पळवलेली ३० हजार रोकड तसेच तालुक्यातील कौडगांव येथिल ज्ञानोबा यादव रेणगडे यांचे घर फोडून सुमारे २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल पळवल्याची कबुली देत.या तीनही गुन्ह्यांमध्ये त्याच्या हिस्स्यास आलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांना दिली आहे.यानंतर स्था.गु.शाखेच्या पथकाने त्यास जेरबंद करुन पुढील कारवाईसाठी पुर्णा पोलीसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे.
————————
दरोड्याच्या गुन्ह्यातही होता फरार
अशोक उर्फ बहादूर भोसले याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून चार ते साडेचार वर्षांपूर्वी गडचिरोलीत चारमोशी तालुक्यातील आकाश आनंद मंडल यांना सोनं देतो म्हणून बोलावून घेत त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे जवळचे सुमारे ४ लाख १७ हजार लुटले होते.या प्रकरणी गुरनं १०२/२०२२ कलम ३९५ नुसार पुर्णेत गुन्ह्या दाखल होता.परंतु मागील चार वर्षापासून फरार होता.त्यासह तो सोनपेठ पोलीसांना देखील गु.र.नं. ३७०/२०२४, कलम ३०९(४) या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.











