लोहमार्गावर अनोळखी तरुणाचा मृतदेह
पूर्णा शहरातील लोकोशेड परिसरातील घटना; रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पूर्णा, ता. २८ (प्रतिनिधी) : शहरातील लोकोशेड परिसरातून नांदेडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर सुमारे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सोमवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित तरुणाचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास लोकोशेड परिसरातील नांदेडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सपोनि. गजानन पाटील, सपोनि. शिवाजी सिंगणवाड, पोहेकॉ. सुरेश राठोड, पोहेकॉ. एकनाथ आळसे, पो.शि. राम मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नांदेड लोहमार्गावरील मैल किलोमीटर ३१९/५२ ते ३१९/५६ दरम्यान सुमारे ३५ वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा केला. मात्र, मृतदेहाची तपासणी करूनही त्याची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाचा कोणत्या तरी अज्ञात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची नोंद पूर्णा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ. एकनाथ आळसे करीत आहेत.










