उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७ जुलै रोजी परभणीत
प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर भव्य शेतकरी संवाद मेळावा; खा. संजय जाधव यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न
परभणी, ता. २ (प्रतिनिधी) :
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे दि. ७ जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौन्यावर येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी परभणी येथील सावली विश्रामगृहात खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.
बैठकीस माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, भास्कर लंगोटे, गणेशराव रोकडे, सखुबाई लटपटे, अप्पाराव वावरे, काशिनाथ काळबांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुरेशराव जाधव व विशाल कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शक केले.
खा. संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी बोलताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत (ता.७) जुलै रोजी दुपारी १ वा. आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी संवाद मेळाव्यास जिल्ह्यातील शेतकरी, शिवसेनेचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर
तसेच शासनाच्या योजनांवर यावेळी संवाद साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी केले.बैठकीस शिवसेनेचे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवासेना पदाधिकारी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











