आठवडी बाजारात महीलांची सिनेस्टाईल हाणामारी

Spread the love

सोयरीकीवरुन केलेली मस्करी झोंबली;भर रस्त्यात चोपले;चार जणींनी विरुद्ध पुर्णा पोलीसांत गुन्हा दाखल

पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) :

मुलीच्या सोयरीकीवरून केलेली मस्करी एका महिलेला चांगलीच महागात पडली असून, मस्करीचा राग मनात धरून सिनेस्टाईल पद्धतीने चार जणींनी शिवीगाळ करत थापड-बुक्क्यांनी मारहाण केली, केस ओढून डोके रस्त्यावर आपटले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना पूर्णा शहरात घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी चौघींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना पिराजी शिंदे (वय ३५, रा. आंबेडकर नगर, पूर्णा) या दि. १३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या बहिणीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी परिचयातील सखुबाई लक्ष्मण शिंदे, सपना बालाजी शिंदे, छकुली (पूर्ण नाव माहिती नाही) व पारुबाई पिराजी शेळके (सर्व रा. फुले नगर, पूर्णा) या महिलांची त्यांच्याशी भेट झाली.

यावेळी फिर्यादीने सखुबाई शिंदे यांच्या मुलीच्या सोयरीकीवरून मस्करी केल्याचा राग मनात धरून सखुबाई सोबत असलेल्या चौघींनी फिर्यादी व तिच्या बहिणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर थापड-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच सपना शिंदे व छकुली यांनी मीना शिंदे यांचे केस धरून त्यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने त्या जखमी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात जखमी महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून ता.१६ रोजी तक्रार दाखल केली.गुरनं ३१३/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये चौघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख ताज करीत असून, भरदिवसा गजबजलेल्या आठवडी बाजारात घडलेल्या सिनेस्टाईल हाणामारीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले

You cannot copy content of this page