Parbhani;दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; तरुणाच्या डोक्यात चाकूसदृश वस्तूने वार

Spread the love

चुंगी नाका परिसरातील मध्यरात्रीची घटना; गंभीर जखमी तरुणावर उपचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा, दि. १६ (प्रतिनिधी) :
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर चाकूसदृश वस्तूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पूर्णा शहरातील चुंगी नाका परिसरात घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल देसु पवार (वय २७, रा. सिद्धार्थ नगर, पूर्णा) हे गुरुवारी (दि. १६) पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एका साक्षीदारासह मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी चुंगी नाका परिसरात त्यांचा परिचित असलेला सिद्धांत उर्फ सिध्दू गायकवाड (रा. पंचशील नगर, पूर्णा) याने त्यांना आवाज देऊन मोटारसायकल थांबविण्यास सांगितले.

यानंतर आरोपीने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र राहुल पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. त्याने शिवीगाळ करत चाकूसारख्या दिसणाऱ्या धारदार वस्तूने राहुल पवार यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

जखमी राहुल पवार यांनी प्रथम उपचार घेतल्यानंतर पूर्णा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा क्रमांक ३१४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) व ३५२ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भुसारे करीत असून, मध्यरात्री सार्वजनिक रस्त्यावर घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page