धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पूर्णा शहर भगवेमय

Spread the love

भव्य शोभायात्रा, आकर्षक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

पूर्णा | प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात गुरुवारी (ता.१४) अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जय भवानी, जय शिवराय तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेमुळे शहर भगवेमय झाले होते.

शिवप्रेमी जनतेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्यानिमित्त शहरातील विविध भागांतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या शोभायात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. युवक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण केले.

मिरवणुकीत सादर करण्यात आलेले धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे विशेष आकर्षण ठरले. भगवान नरसिंह यांचा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच श्रीराम-हनुमंत, शिवशंकर-गौरी यांची नंदीवरील सवारी, पारंपरिक वेशभूषा आणि विविध ऐतिहासिक-सांस्कृतिक सादरीकरणांनी नागरिकांची मने जिंकली. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या दमदार तालावर युवकांनी जल्लोषात नृत्य करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दरम्यान, सकाळपासूनच छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि युवक संघटनांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रंगीबेरंगी रोषणाई आणि आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर उजळून निघाला. या दिमाखदार सोहळ्यामुळे पूर्णा शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

या जयंती उत्सवाच्या यशस्वितेसाठी जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page