पूर्णेत चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली!

Spread the love

सराफ दुकानातून लाखोंचा ऐवज लंपास; २० दिवसांत सात-आठ ठिकाणी चोरी;पोलीस निरीक्षकाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी) :

शहर व परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, मागील २० दिवसांत चार घरफोडीच्या घटना घडल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा चोरट्यांनी बुधवारी, (ता.१९) ऑगस्टच्या मध्यरात्री शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत धाडसी चोरी करीत तीन ग्राहक सेवा केंद्रांसह एका सराफाचे दुकान फोडले, तर अन्य एका सराफ दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले असून,घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.,येथिल पोलीसांच्या कामगिरीवर संताप व्यक्त होत आहे.

     पुर्णा शहरातील महाराष्ट्र बँकेलगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ब. संत कृपा ज्वेलर्समधून सोन्या-चांदीचे सुमारे लाखों रुपयांचे दागिने, तर शिवा मल्टी सर्व्हिसेस, पलसिद्ध आणि कनिष्क ग्राहक सेवा केंद्रांतून अंदाजे १० ते १५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. न्यू आराध्या ज्वेलर्सचे कुलूप तोडून चोरीचाही प्रयत्न करण्यात आला.याघटनेत कोणत्या व्यापा-यांची किती लुट झाली याची सखोल माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतर समजणार आहे.दरम्यान घटनेतील संशयित हालचाली काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाल्याचे समजते. माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत एकाच रात्री सलग दुकाने फोडली जात असताना पोलिसांची रात्रगस्त नेमकी कुठे होती? असा संतप्त सवाल व्यापारी व नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

२० दिवसांत सात-आठ ठिकाणी चोरी; पोलिसांना चोरट्यांचे वारंवार आव्हान

गेल्या काही दिवसांत सिद्धार्थनगर येथील साडेपाच लाखांच्या घरफोडीसह, पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसरातील सव्वा लाख रुपयांची चोरी आणि कानडखेड येथील दोन घरांत चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा तपास पूर्ण होण्याआधीच आता चोरट्यांनी पुन्हा शहराच्या बाजारपेठेत हात साफ केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुर्णा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

‘चोरट्यांची बॅटिंग सुरू; पोलिसांची फिल्डिंग कुठे?’

वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रात्रगस्तीचे दावे केले जात असताना चोरटे मध्यरात्री दुकाने फोडून पसार होत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.“वीस दिवसांत सात-आठ वेळा चोरी होत असताना पोलीस नेमके करतात तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक व व्यापारी वर्गातून उपस्थित होत आहे.

पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे

वाढत्या चोरीच्या घटनांची जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गंभीर दखल घेऊन तपासाची समीक्षा करावी, प्रभावी रात्रगस्त सुरू करावी आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page