Beed Heavy Rain News;धारुरात वाण नदीच्या पुरात दोघेजणं वाहून गेले, एकाचा मृत्यू
धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
किल्ले धारूर ता.२८ (प्रतिनिधी):धारूर तालुक्यात बुधवारी (दि. २७) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. दरम्यान, यातील एकाच मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तांदळवाडी धरण भरून वाहत असून त्यामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रुईधारुरहून अंजनडोहकडे जाताना रात्री आठ वाजता आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय ४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला.

आवरगाव येथे तरुण बेपत्तादरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबूराव लोखंडे ( २६ ) हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे.












