मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी बीड-आमळनेर रेल्वेमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण.!

Spread the love

आॅननलाईन पद्धतीने दाखवणार हिरवी झेंडी;

बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा मार्ग मोकळा;‎२३ स्थानकावरुन प्रवाशांना घेता येणार सेवेचा लाभ

बीड(परळी)/२ सप्टेंबर;अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या अमळनेर-बीड या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहे. यामुळे बीड ते नगरपर्यंतचा रेल्वे मार्ग पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वेसेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा क्षण असणार आहे.

मध्य रेल्वे क्षेत्रांतर्गत अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या मार्गावर १६१.२५ किमी लांबीचा ब्रॉडगेज लाइन प्रकल्प तयार केला जात आहे. हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्याला बीड आणि परळी वैजनाथशी जोडेल. या विभागात एकूण २३ नवीन रेल्वे स्थानके असतील. त्यापैकी काही बांधली गेली आहेत आणि काही अजूनही बांधली जात आहेत. या प्रकल्पाचा खर्च ४,९५८ कोटी आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस हा १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आता या दिवशीच पंतप्रधान मोदी हे ७५ व्या वाढदिवशी या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचे उद्घाटन करतील. नवीन रेल्वेमार्गामुळे मराठवाड्यात व्यवसाय, उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढतील. चांगल्या वाहतूक सुविधांमुळे शिक्षण आणि आरोग्यसेवा सुलभ होतील. हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरेल. रेल्वे मार्गामुळे कृषी उत्पादनांची, विशेषत: ऊस आणि कापसाची वाहतूक सुलभ होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. उद्योग वाढीमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. नगर-बीड-परळी नवीन लाइन-सीआरने एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत १४७.७७ किमी मल्टिट्रॅकिंग पूर्ण केली आहे.आता लवकरच नगर ते परळी रेल्वे मार्ग पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. २३ सप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ किमीचा मार्ग पूर्ण होऊन अहिल्यानगर ते आष्टी फेरीही सुरू झाली होती. विघनवाडी ते बीड हा ६७.१२ किमीचा रेल्वे मार्ग पूर्ण झाला आहे. या वर्षाअखेर अहिल्यानगर ते बीडपर्यंत रेल्वे धावणार आहे. २६१.२५ पैकी १३३.३ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

You cannot copy content of this page