परभणी जिल्ह्यातुन ६ जणं हद्दपार.!

Spread the love

अवैध वाळूसह गुन्हेगारी विरोधात प्रशासनाचा बडगा;आणखी १८ प्रस्ताव विचाराधीन; उपविभागीय अधिकारी लाहोटी यांची कारवाई;

परभणी,ता.१५(प्रतिनिधी):

जिल्ह्यातील सेलू व जिंतूर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलत सहा जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. सेलूचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी ही कारवाई करत संबंधितांना परभणीसह शेजारच्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन, घरफोडी, चोरी, दारू विक्री यांसारख्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. त्याअंतर्गत सादर झालेल्या प्रस्तावांवर १३ फेब्रुवारी रोजी शिक्कामोर्तब करण्यात आले.

कारवाई झालेल्यांमध्ये वालूर येथील रोहण उर्फ सुंदर बाबासाहेब वाटूरे याच्यावर पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला परभणी जिल्ह्यातील चार तसेच जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून तडीपार करण्यात आले आहे. देऊळगाव येथील राधाकिशन पिराजी साळवे याच्यावर अवैध दारू विक्रीसंदर्भातील गुन्ह्यांमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारी लागू करण्यात आली आहे.

सेलू येथील युवराज उर्फ प्रेम बाळू लाटभजे याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल असून त्यालाही परभणी व जालना जिल्ह्यातील सात तालुक्यांतून बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वझर बु. येथील भगवान सखाराम मते याच्यावर पाच गुन्हे दाखल असल्याने त्याला परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

चारठाणा येथील सलमान खान नशीब खान पठाण याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि अवैध दारू विक्रीचे गुन्हे नोंदवले गेले असून त्यास परभणी व जालना जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच जिंतूर येथील शेख वजीर शेख बिसराम उर्फ साई याच्यावर जुगार आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यालाही परभणी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.


वाळू माफियांवरही कारवाईचा धडाका

प्रशासनाने केवळ अट्टल गुन्हेगारांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरही कडक नजर ठेवली आहे. यापूर्वी १२ जणांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले असून आणखी १८ जणांविरोधातील प्रस्तावांची छाननी सुरू आहे. लवकरच त्यांच्याविरुद्धही कठोर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील, तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page