हिंगोली जिल्ह्याला गुरुवारी दोन भूकंपाचे धक्के
–नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
हिंगोली/प्रतिनिधी
जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी(दि. २) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हवामान विभागाच्या माहितीनुसार पहाटे १:२० वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा, तर सकाळी १०:१४ वाजता ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. प्रशासनाने नागरिकांना भूकंपापूर्वी, भूकंपाच्या वेळी आणि भूकंपानंतर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. घरांचे भूकंपरोधक बांधकाम करणे, जड वस्तू सुरक्षितपणे बसविणे, आपत्कालीन वस्तुसंच तयार ठेवणे तसेच कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क व स्थलांतर आराखडा तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना संयम राखून अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.











