पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना

Spread the love

आमदार सईद खान यांचा पुढाकार; खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत अनावरण, जिल्हाभर चर्चेला उधाण

परभणी, ता. २८ (प्रतिनिधी) :

शहरात पुतळा बसविण्यासाठी लागणारी प्रशासनाची अंतिम परवानगी प्रक्रिया सुरू असतानाच अत्यंत गोपनीयतेने हा पुतळा उभारण्यात आल्याने जिल्हाभर या घटनाक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

पाथरी शहरातील मानवत-उमरीफाटा टिपाईन्ट परीसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना रविवारी (ता.२८) रोजी करण्यात आली असून,खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.नवनिर्वाचित विधान परिषद आमदार सईद खान यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारण्यात आला असल्याची माहिती आहे.

      पाथरी शहरातील मानवत टी-पॉईंटवरील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिकांची होती.आमदार सईद खान यांनी या ठिकाणी पुतळा उभारण्याचा संकल्प करत सुमारे सहा महिन्यांपूर्वी आकर्षक चबुतरा आणि संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले होते. पुतळाही तयार होता; मात्र काही प्रशासकीय परवानग्यांअभावी स्थापना रखडली होती.दरम्यान, विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याशिवाय शपथ घेणार नसल्याचा निर्धार आमदार सईद खान यांनी व्यक्त केला होता. अखेर रविवारी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास खासगी वाहनातून पुतळा शहरात आणण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पूर्वनियोजित चबुतऱ्यावर पुतळ्याची स्थापना करण्यात आली. मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, या हालचालींची माहिती प्रशासनालाही अंतिम क्षणापर्यंत मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.

रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सईद खान यांच्या हस्ते पुतळ्याचे विधिवत अनावरण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांचा गजर, वाद्यवृंद, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पुतळा परिसर आकर्षक फुलसजावटीने सजविण्यात आला होता.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, शिवसेना शहरप्रमुख लालू खान, नाना टाकळकर, एकनाथ शिंदे, बालाजी कुराडे, प्रल्हादराव चिंचाणे, नगरसेवक अमोल भालेपाटील, गोविंद हरकळ, वैजनाथ कोल्हे, विक्रम गायकवाड, संतोष गलबे, उदय भिसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि शहर व ग्रामीण भागातील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

“शिवरायांचा पुतळा उभारल्याशिवाय शपथ घेणार नव्हतो” — आ. सईद खान

“या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परवानगी प्रक्रियेला गती मिळाली. हा पुतळा स्वखर्चातून उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केल्याशिवाय विधान परिषद सदस्यपदाची शपथ घेणार नाही, असा निर्धार मी केला होता. आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे,” असे आमदार सईद खान यांनी सांगितले.

“पाथरीकरांचे चार दशकांचे स्वप्न साकार” — खा. संजय जाधव

“महामार्गाचे काम सुरू असताना या ठिकाणी पुतळ्यासाठी जागा आरक्षित करणाऱ्यांचे अभिनंदन करावे लागेल. अनेक वर्षांपासून पाथरीकरांची इच्छा होती की, या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. आमदार सईद खान यांनी ते स्वप्न पूर्ण केले आहे. समाजहिताची काही कामे जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन करावी लागतात. शिवरायांविषयी असलेली त्यांची श्रद्धा आज कृतीतून दिसून आली,” असे मत खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page