परभणीत रविवारी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

Spread the love

‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष

परभणी, ता. २७ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवार, दि. २८ जून रोजी परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांतील खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे स्वतः दौरे करत असून, त्याचाच एक भाग म्हणून ते परभणी दौऱ्यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी परभणीत मुक्कामी येणार आहेत.

रविवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या जाहीर सभेकडे जिल्ह्यासह संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. खासदार संजय जाधव यांनी ‘ऑपरेशन टायगर’मध्ये बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः परभणीत येऊन शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दौऱ्यातून उद्धव ठाकरे बंडखोरांवर थेट टीका करत निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना केले आहे.

You cannot copy content of this page