अंबाजोगाईत ‘स्पा सेंटर’वर पोलिसांची छापेमारी

Spread the love

तीन बेकायदेशीर सेंटर सील; आयपीएस ऋषिकेश शिंदे यांच्या कारवाईने शहरात खळबळ

अंबाजोगाई, ता. २७ (प्रतिनिधी) : अंबाजोगाई शहरातील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६) मोठी धडक कारवाई करत तीन स्पा सेंटरला टाळे ठोकले. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोखरी रोड परिसरातील दोन तर तथागत चौकातील एका स्पा सेंटरवर पोलिसांच्या विशेष पथकाने अचानक छापे टाकले. अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला संबंधित स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.छापेमारीदरम्यान संबंधित चालकांकडे स्पा सेंटर चालविण्यासाठी आवश्यक असलेले वैध परवाने, नोंदणी व इतर कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ तिन्ही स्पा सेंटर सील करून बंद केले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक फड, पोलीस अंमलदार खरटमल, खेलबुडे, खंदारे तसेच महिला पोलीस अंमलदार किर्दंत आणि भुसारी यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या अचानक धाडीमुळे परिसरात काही काळ मोठी चर्चा रंगली होती.शहरातील वाढत्या अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत असून पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page