Court Judgement;बलात्कार व हत्या प्रकरण;तिघांना जन्मठेप
२०१३ मधील विटभट्टीवरील महिलेच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
गंगाखेड, दि. २१ (प्रतिनिधी) :
परभणीच्या गंगाखेड तालुक्यात २०१३ मध्ये विटभट्टीवर काम करणाऱ्या २५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळून हत्या केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात गंगाखेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांनी आरोपी बाबासाहेब राणबा सोडगीर याला बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांचा सश्रम कारावास व दंड, तसेच खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. सहआरोपी रंजना लक्ष्मण सरवदे आणि हरीभाऊ ज्ञानोबा मुसळे यांनाही जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.या प्रकरणात पीडितेचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय पुरावे आणि पंचांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन बी. पौळ यांनी प्रभावी युक्तिवाद केला.











