पूर्णेत ५ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित
‘महासमाचार’च्या वृत्ताची दखल; खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी);
शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशकांचा पारदर्शक आणि सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने पूर्णा तालुक्यात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. खत विक्रीतील अनियमितता, शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे, जादा दराने खतांची विक्री करणे, बिलांवर स्वाक्षरी न घेणे तसेच नोंदवहीतील आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्याने पूर्णा तालुक्यातील तब्बल पाच खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून,एका दुकानदाराने सक्त ताकीद दिल्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी बी.बी. कोळेकर यांनी काढले आहेत.या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुर्णा तालुक्यातील खत विक्रेत्यांकडून चढ्या दराने खतांची विक्री, दुकानात अनियमितेबाबत आवाज उठवत ‘महासमाचार’ मध्ये (ता.१०) ऑगस्ट रोजी ‘पूर्णेत खत विक्रेत्यांकडून लुट!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने तालुक्यातील खत विक्री केंद्रांची तपासणी सुरू केली. तपासणीत विविध गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर अखेर ६ विक्री केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बी.बी.कोळेकर यांनी परभणी कृषी विकास अधिकारी डी.टी. सामाले, कृषी विकास अधिकारी; जी.के. काळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक; बी.बी. गिरी, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी परभणी; जी.बी. दहीवडे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), पंचायत समिती पूर्णा; बी.एस. गाढवे, कृषी अधिकारी (परवाना शाखा) तसेच संबंधित विक्रेते यांच्या उपस्थित कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी संबंधित विक्रेत्यांनी सादर केलेली बाजू, खुलासे आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
सुनावणीदरम्यान झालेल्या चर्चेत संबंधित विक्रेत्यांकडून खत नियंत्रण आदेश, १९८५ मधील खंड ४, खंड ७ व ८ तसेच खंड ३५ (१)(ब) यांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने.खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना खरेदीनंतर पक्की बिले न देणे, निर्धारित दरापेक्षा जादा दराने खतांची विक्री करणे, बिलांवर ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या न घेणे आदी प्रकारास जबाबदार धरून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी पारवे कृषी केंद्र, पूर्णा; मे. अमृत फर्टिलायझर, पूर्णा; पारवे एजन्सीज, पूर्णा; महारुद्र कृषी केंद्र, नावकी; आणि पंडीत कृषी केंद्र, कावलगाव, ता. पूर्णा यांचे परवाने निलंबित तर बाबारामअप्पा एकलारे, पूर्णा यांना सक्ती ताकीद देण्यात आली असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.निलंबनाच्या कालावधीत संबंधित विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची विक्री किंवा साठवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
नियमभंग करणाऱ्यांची गत नाही-बी.बी.कोळेकर जिल्हा कृषी अधिकारी परभणी
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून कृषी विभागाने दिला आहे. भविष्यात पुन्हा अशाच प्रकारच्या गंभीर अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.











