धार्मिक स्थळाचे भुखंड नातेवाईकांच्या नावे नामांतरण करुन देणारा तो नगरसेवक कोण..!
पूर्णेत चर्चेला उधाण;महेला मस्जिद कमिटीच्या जमिनीचे प्रकरण; सामाजिक कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे व वक्फ बोर्डाकडे धाव
पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी) : धार्मिक स्थळांच्या जमिनीवर डोळा ठेवून आपल्या नातेवाईकांच्या नावे तब्बल ४० गुंठे जमिनीचे नामांतरण करून घेणारा तो लोकप्रतिनिधी कोण? त्याला या कामासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या मदत करणारे लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी कोण असा संतप्त सवाल आता पूर्णा शहरात उपस्थित होत असुन ,चर्चेला उधाण आले आहे.महेला मस्जिद कमिटीच्या मालकीच्या गट क्रमांक २५/१ मधील **४० गुंठे जमीन नियमबाह्य पद्धतीने परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.या प्रकरणात पूर्णा नगरपालिकेच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुर्णा शहरातील महेला मस्जिद कमिटीच्या जमिनीचे ३० जून २०२६ रोजी नांदेड येथील एका व्यक्तीच्या नावे नामांतरण करण्यात आले,. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी या नामांतरणावर आक्षेप घेतल्यानंतर नगरपालिकेने ही नोंद २८ जुलै २०२६ रोजी रद्द केली असल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र, सर्वांत गंभीर बाब म्हणजे धार्मिक संस्थेशी संबंधित असलेल्या या ४० गुंठे जमिनीचे नामांतरण एका नगरसेवकाच्या नातेवाईकांच्या नावे करण्यासोबतच गट नंबर २५/२,१४३/१ ते १४३/५ मधील जमीनीचे नियमबाह्य पद्धतीने नामांतरण करण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. सदरील धार्मिक स्थळाचे जमीनीची नोंद परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे नेमकी कशी काय व कोणाच्या आदेशाने, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या नियमांतर्गत करण्यात आली,त्या नगरसेवकाच्या नात्यातील व्यक्ती असल्याने त्याला पदावरून पायउतार व्हावे लागणार का.? अशा चर्चेला उधाण आले आहे.धार्मिक स्थळाच्या जमिनीबाबत संशयास्पद पद्धतीने नामांतरणाची नोंद होणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर ती रद्द होणे, या संपूर्ण प्रकारामुळे पूर्णा नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जिल्हाधिकारी आणि वक्फ बोर्ड या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेतात आणि ‘धार्मिक जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या’ कथित सूत्रधारांपर्यंत चौकशी पोहोचते का, याकडे पूर्णेकरांचे लक्ष लागले आहे.
नामांतरण झालेच कसे? चौकशीची मागणी
वक्फ अथवा धार्मिक संस्थेच्या मालमत्तेच्या व्यवहारात संबंधित कायदे, नियम आणि सक्षम प्राधिकरणाची प्रक्रिया पाळणे आवश्यक असताना, महेला मस्जिद कमिटीच्या जमिनीबाबत नामांतरणाची प्रक्रिया कोणत्या आधारावर पार पडली, अशी मागणी नगरसेवक रौफ कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते शेख सोहेल शेख खुद्दुस, शेख इरफान (नेता) शेख बाबू तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष सरान बागवान आदींनी जिल्हाधिकारी व संबंधित वक्फ बोर्डाकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.याकार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर नामांतरणाची नोंद रद्द करण्यात आली असली तरी, मूळात नियमबाह्य पद्धतीने नोंद करण्यात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार कोण? आणि त्यामागे कोणाचा दबाव अथवा हस्तक्षेप होता का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
‘नोंद रद्द करून प्रकरण संपणार नाही!’
महेला मस्जिद कमिटीच्या गट क्रमांक २५/१ मधील ४० गुंठे जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने नामांतरण करण्यात आल्याचा आरोप गंभीर आहे. संबंधित नामांतरण रद्द करण्यात आले असले तरी, ही नोंद करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्ती, अधिकारी तसेच या प्रकरणामागील सूत्रधारांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.











