पूर्णा तहसीलवर धडकला प्रहारचा ‘आक्रोशमोर्चा’
दिव्यांग, निराधारांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास ता.अ.शिवहार सोनटक्केंचा तीव्र आंदोलनाचा इशारा
पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दिव्यांग व निराधार नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २४) पूर्णा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी वंचित, निराधार व दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रोश करत तहसील प्रशासनाला निवेदन सादर केले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी दिला.
पूर्णा तालुक्यातील अनेक निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील सहा महिन्यांपासून तात्पुरते मानधन बंद आहे.ते बंद असलेले मानधन तातडीने सुरू करून थकीत रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, दिव्यांग व निराधारांचे मानधनासाठी सादर केलेले प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा, योजनांत बोगस अथवा अपात्र लाभार्थी असल्यास त्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, मुंबर येथील दिव्यांग शेतकरी अंकुश शिंदे व लक्ष्मण शिंदे यांच्या जमिनीच्या प्रलंबित मोजणीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, तसेच दिव्यांग नागरिकांना तहसील कार्यालयात ये-जा करण्यासाठी आवश्यक रॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी,पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, दिव्यांगांच्या धान्य वितरणात होत असलेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषीं रेशन दुकानदार कारवाई करावी, अश्या मागण्या निवेदनाद्वारे दिल्या आहेत.
मोर्चाचे निवेदन प्रशासनाच्या वतीने ना.तहसीलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले.निवेदनावर शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, शाम सोनवणे, राम सुके, रहीम, श्रीहरी इंगोले, चपत कदम, अंकुश शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पूर्णा पोलिस प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता











