गंगाखेडमध्ये १३ हजारांचा गांजा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मुस्कान कॉलनीतील घरावर छापा, एक आरोपी ताब्यात
परभणी,/गंगाखेड दि. २५ (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाखेड शहरात धडक कारवाई केली. मुस्कान कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ६५५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १३ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना २४ ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरातील मुस्कान कॉलनी परिसरात एक इसम आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी आरोपीच्या घराची झडती घेतली असता ६५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तातडीने गांजा जप्त करून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस हवालदार महेश कवठाळे, सचिन भदर्गे, माणिक वाघ, महारुद्र सपकाळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल दिलीप नीलपत्रेवार यांनी सहभाग घेतला.











