पूर्णा शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सर्वधर्मीयांना दिला बंधुभावाचा संदेश

Spread the love

भव्य जुलूस, धार्मिक प्रवचने, गोड पदार्थांचे वाटप व अन्नदानाने शहरात उत्साहाचे वातावरण

पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सण पूर्णा शहरात बुधवारी मोठ्या धार्मिक उत्साहात, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध मुस्लिमबहुल भागांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोड पदार्थांचे वाटप, भव्य जुलूस, धार्मिक प्रवचने तसेच अन्नदानाच्या उपक्रमांमुळे दिवसभर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

       सकाळी फजरच्या नमाजपठणानंतर शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जामा मस्जिद परिसरात एकत्र आले. त्यानंतर तेथून ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस काढण्यात आला. धार्मिक घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने परिसर दुमदुमून गेला.हा जुलूस जामा मस्जिद परिसरातून मुख्य मार्गाने मस्तानपुरा, शिवाजी चौक, मराठगल्ली, कुंभार गल्ली, कुरेशी मोहल्ला मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पोहोचला. त्यानंतर पुन्हा जामा मस्जिद परिसरात जुलूसाची सांगता करण्यात आली.यावेळी पेशइमाम शमीम रिजवी, पेशइमाम अहमद रजा, पेशइमाम रशीद सांब, मौलाना जाकीर कुरेशी यांच्यासह अन्य धार्मिक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी प्रेम, शांतता, मानवता, बंधुभाव आणि सर्वांप्रती सद्भावनेची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन केले.

         छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देत गोड पदार्थां पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. यावेळी नगरसेवक अमजद नुरी, सुनील जाधव, रवि गायकवाड, अशोक वाघमारे, शेख सिराज, शेख सोहेल आदींनी ही शुभेच्छा दिल्या. जुलुसनंतर दर्गा परिसरात अन्नदान व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शहरातील विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

You cannot copy content of this page