गोदावरीत बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह २० तासांनी सापडले

Spread the love

‘श्री’विसर्जनावेळी धानोरा काळे पुलावर घडलेली घटना;पुर्णा-पालम पालीकेच्या बचाव पथकाचे शर्थिचे प्रयत्न; विसर्जन स्थळीसुरक्षाव्यवस्थेचा अभावाने भक्तांत नाराजी
पूर्णा,ता.२६(प्रतिनिधी) :
श्री विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ शुक्रवारी, दि. २५ सप्टेंबर रोजी घडली. मुंजाजी आश्रोबा घोरपडे (वय १७) आणि गजानन रामदास घोरपडे (वय २०), दोघेही रा. पालम, अशी मृत तरुणांची नावे आहेत. तब्बल २० तासांच्या शोधमोहीमेनंतर शनिवारी दोघांचेही मृतदेह सापडले. दरम्यान, श्री विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असतानाही शासन-प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याने गणेश भक्तांनी गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
पूर्णा आणि पालम तालुक्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ मागील अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन केले जाते. यंदाही श्री विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली होती. पालम येथील जय मल्हार गणेश मंडळाचे पदाधिकारी व गणेशभक्तही गणेशमूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी आले होते.गणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात नेत असताना माऊली घोरपडे, मुंजाजी घोरपडे आणि गजानन घोरपडे हे तिघे तरुण पाण्यात उतरले. यावेळी अचानक मुंजाजी आणि गजानन हे दोघे खोल पाण्यात बुडाले, तर माऊली घोरपडे हे पोहत सुखरूप बाहेर आले. दोघे तरुण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच उपस्थित युवकांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या; मात्र अंधार, नदीपात्राची खोली आणि पाण्याचा प्रवाह यामुळे त्यांचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे आणि ठाणेदार आदित्य लोणीकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. पूर्णा व पालम येथील आपत्ती व्यवस्थापन पथकांना बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकास घटनास्थळी रात्री मदतकार्य करण्यात अडचणी निर्माण झाल्याने शनिवारी सकाळी पहाटे साडे पाच वाजेपासून शोध मोहीम हाती घेण्यात आली.स्थानिक मच्छीमार तसेच भोई समाजातील नागरिकांनी बचाव पथकाला मदत केली. पूर्णा नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील गणेश रापतवार, अमजद कुरेशी,दीपक गवळी, यशवंत वाघमारे, सोनाजी खिल्लारे, तनवीर कुरेशी यांच्यासह गोताखोरांनी नदीपात्रात तब्बल २० तास शोधमोहीम राबवली.शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गजानन घोरपडे यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुलापासून काही अंतरावर मुंजाजी घोरपडे यांचाही मृतदेह शोधून काढण्यात बचाव पथकाला यश आले.
या घटनेप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनेची माहिती दिली. श्री विसर्जनाच्या आनंदाला या दुर्दैवी घटनेने गालबोट लागले असून, दोन तरुणांच्या मृत्यूने पालम शहरासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

सुरक्षा, व नियोजनाचा अभाव.!
धानोरा काळे येथिल गोदावरी नदीच्या पुलावर दरवर्षी ‘श्री’ विसर्जनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची माहिती असतानाही नदीपात्र परिसरात आवश्यक ती पूर्वतयारी आणि सुरक्षाव्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. नदीपात्राजवळ प्रशिक्षित बचाव पथक, पुरेसे गोधाखोर, आवश्यक बचाव साहित्य आणि तत्काळ मदतीची व्यवस्था असती तर बचावकार्य अधिक वेगाने सुरू झाले असते,तर ही दुदैवी घटना घडलीच नसती अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page