परभणी जिल्ह्यातील ५ जण हद्दपार

Spread the love

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई; गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई; पूर्णा व परभणीतील पाच जणांचा समावेश

परभणी, ता. ३० (प्रतिनिधी) : गुंड प्रवृत्तीचे कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या तसेच जबरी चोरी, मारहाण, गंभीर दुखापत, घातक शस्त्रांचा वापर आणि गैरकायदेशीर जमाव करून कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पाच जणांना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पूर्णा तालुक्यातील तिघांसह परभणी शहरातील नवामोंढा व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका इसमाचा समावेश आहे.

पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख अंकित ऊर्फ बाळा संजय गायकवाड (वय २२, रा. पूर्णा) तसेच टोळी सदस्य आयुष राजेंद्र बरकुंटे (वय २०, रा. शास्त्रीनगर, पूर्णा) आणि श्रीनिवास रमेश गाढवे (वय २१, रा.कोळीवाडा पूर्णा) यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी, पूर्णा यांनी केली.त्यानंतर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंतिम चौकशी केली. त्यानुसार अंकित ऊर्फ बाळा संजय गायकवाड व आयुष राजेंद्र बरकुंटे यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तर श्रीनिवास रमेश गायकवाड/गाढवे याला परभणी जिल्ह्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, नवामोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवेक धनेश्वर साळवे (वय २३, रा. हाडको कॉलनी, परभणी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ अन्वये दोन वर्षांसाठी हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, परभणी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. अंतिम चौकशीनंतर त्याला सहा महिन्यांसाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.तर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोहेल खान नयुम खान (वय २२, रा. अजिजीया कॉलनी, परभणी) याच्याविरुद्धही कलम ५६ अन्वये दोन वर्षांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकारी यांनी अंतिम चौकशी केल्यानंतर त्याला एक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध करण्यात येणाऱ्या या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

You cannot copy content of this page