महसूलचा कारभार झिरो तलाठी व कोतवालांच्या हाती..!
पूर्णेतील जनतेची पिळवणूक;वरिष्ठाकडून कारवाई शुन्य
पूर्णा प्रतिनिधी
महसूल विभागातील कोतवाल व तलाठ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या झिरो तलाठ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, वरिष्ठांची मुकसंमती असल्याने कोतवाल आपला सज्जा सोडून तहसीलचा कारभार पाहत आहेत तर तलाठी सज्जाचा कारभार झिरो तलाठ्यांनी सुरू करुन जनतेची पिळवणूक सुरू केल्याने जनतेतून कारवाईची मागणी होत आहे.
पुर्णा तालुक्यातील ९३ गावांतील महसूल विभागाचा कारभार पाहण्यासाठी सज्जा नुसार तलाठी व कोतवाल नियुक्त करण्यात आलेले आहेत.परंतु यातील बहुतांश कोतवाल हे गाव सज्जावर न राहता तहसील कार्यालयात अधिका-यांच्या मागे पुढे लुडबुड करताना,वाळु,गौण खनिज माफीयांशी सेटींग लावून वसुली करताना दिसत आहेत.विभागातील पुरवठा, निवडणूक, निराधार योजना,सह विविध विभागांत कोतवालांनी वरकमाईसाठी आपले बस्तान बसवले आहे.तहसिल कार्यालयात काम घेऊन आलेल्या नागरिकांना साहेबांअगोदर कोतवालांशी बोलावे लागते आहे.तर ग्रामीण भागाचा कणा असलेल्या तलाठ्यांनी गाव सज्जावर आपले कार्यालय न ठेवता शहरात आपलं कार्यालय सुरू केलं आहे.तेथे कम्युटर ,चालवणे, फेरफार आदीं नोंदचीच्या फाईल सांभाळण्यासाठी झिरो तलाठी नियुक्त केले आहे.शहरातील जमीन खरेदी विक्री प्रक्रिया मोठ्या प्रमाणात असल्याने सातबारा फेरफार करण्यासाठी झिरोतलाठ्यांनी प्रति गुंठा फेरफारकरीता १० ते १५ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तलाठीसाहेबा ना सज्जावर ना तहसील कार्यालयात ना तलाठी कार्यालयात मग नागरिक हेलपाटे घालुन सरळ झिरोतलाठ्यांशी कामाची तडजोड करुन नाईलाजाने अव्वाच्या सव्वा रक्कम देत काम करत आहेत. महसुली विभागात कोतवाल व झिरोतलाठ्यांनी जनतेची अक्षरशः लुट सुरू केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत असून यात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी लक्ष घालुन संबंधित कोतवालांस आपल्या सज्जावर पाठवावे तसेच तलाठी कार्यालय ठाण मांडून बसलेले झिरो तलाठी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पुर्णेकरांतुन जोर धरू लागली आहे










