वागदरीत गांजाची शेती;८२ झाडे जप्त!

Spread the love

१५ लाख ७५ हजारांचा गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, गंगाखेड तालुक्यात खळबळ

परभणी/ प्रतिनिधी :
गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागदरी शिवारात प्रतिबंधित गांजाची लागवड उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळदरी पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी (ता. ८) छापा टाकत गांजाची तब्बल ८२ हिरवी झाडे जप्त केली. या झाडांचे वजन ३१ किलो ५०० ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत १५ लाख ७५ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे गंगाखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागदरी शिवारातील शेत गट क्रमांक ५२ मध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाईचे नियोजन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार चंदनसिंह परिहार, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, महारुद्र सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप निलपत्रेवार व गजानन क्षिरसागर यांच्या पथकाने पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक दीपाली गीते आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने वागदरी शिवारात छापा टाकला. यावेळी शेतात गांजाची ८२ हिरवी झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त करून वजन केले असता त्यांचे एकूण वजन ३१ किलो ५०० ग्रॅम भरले.
या प्रकरणी केशव वैजनाथ मुरकुटे (रा. पिसेवाडी, ता. गंगाखेड) याच्याविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पिंपळदरी पोलीस करीत आहेत.

जिल्ह्यात गांजा लागवडीचे जाळे वाढतेय?
परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पूर्णा, जिंतूर, गंगाखेडसह विविध तालुक्यांत पोलिसांकडून छापेमारी करून प्रतिबंधित गांजा लागवडीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. या कारवायांत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वारंवार गांजा लागवडीची प्रकरणे समोर येत असल्याने जिल्ह्यात या अवैध प्रकाराचे लोण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा लागवडीमागील साखळी शोधून काढण्याचे आणि या प्रकाराला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

You cannot copy content of this page