गळफास प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
हुंडा न दिल्याचे कारण, शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप;पुर्णेच्या सिद्धार्थ नगरातील भाग्यश्री खरात प्रकरणाला नवे वळण
पूर्णा, ता. ३० (प्रतिनिधी) : सिद्धार्थनगर परिसरातील भाग्यश्री राहुल खरात (वय ४०) या महिलेने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महीलेचा दुदैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, भाग्यश्री यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून त्यांच्या पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत भाग्यश्री यांच्या आई कविताबाई मारुती सोमवंशी (वय ६२, रा. निडेबांध, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार राहुल प्रल्हाद खरात, शकुंतला प्रल्हाद खरात आणि गौतम प्रल्हाद खरात (सर्व रा. सिद्धार्थनगर, पूर्णा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, भाग्यश्री यांच्या विवाहाला सुमारे १९ वर्षे झाली होती. सासू, दीर व पतीकडून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच, ‘तुझ्या आई-वडिलांनी तुला हुंडा दिला नाही’, असे म्हणत त्यांना त्रास देण्यात येत होता. त्यांना उपाशीपोटी ठेवून मानसिक त्रास दिल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता.२९) रोजी भाग्यश्री यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना खाली उतरवून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.तपास, पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार हे तपास करीत आहेत.










