परभणी गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश
उत्तर प्रदेशातील आरोपी जेरबंद; महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील पाच गुन्ह्यांचा उलगडा; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी, ता. ३० (प्रतिनिधी) : नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत उत्तर प्रदेशातील नजीम मोहिन खान (वय ३१, रा. चिमियावली, जि. संभल) याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून ७० हजार रुपये रोख आणि सुमारे ९० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर २२० सीसी मोटारसायकल असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नानलपेठ हद्दीतील चैन स्नॅचिंगच्या तपासात संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि मध्य प्रदेशातील संबंधित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यातून उत्तर प्रदेशातील आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. चौकशीत नजीम खान याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान नजीम खान व त्याच्या साथीदारांचा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पाच चैन स्नॅचिंग गुन्ह्यांशी संबंध समोर आला. यामध्ये नानलपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हा क्र. ६९३/२०२६ व १००/२०२६, नागपूरच्या प्रतापनगर पोलिस ठाण्यातील गुन्हा क्र. ४३५/२०२६, अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यातील गुन्हा क्र. १४४२/२०२६ तसेच मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील पदमनगर पोलिस ठाण्यातील गुन्हा क्र. १३६/२०२६ यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील नजीमचा साथीदार आसिफ वाजिद शहा (वय २६, रा. भान्सका, हसनपूर, जि. अमरोहा, उत्तर प्रदेश) हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीची तांत्रिक विश्लेषणाशी सांगड घालत आरोपींचा माग काढण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत नजीम खानला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विविध जिल्ह्यांतील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास पुढे सरकला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सपोनि अशोक जायभाये, पोउपनि गणेश सवंडकर, पोह रणजित आगळे, पोह विलास सातपुते, पोह केशव लटपटे, पोह महेश पांगरकर, पोह सानप, पोह इर्शाद अली व पोशी मधुकर ढवळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. बालाजी रेड्डी व गणेश कौटकर यांनी तांत्रिक सहाय्य केले, तर पोह उत्तम हनवते यांनी वाहनचालक म्हणून काम पाहिले. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.
छायाचित्र : चैन स्नॅचिंग प्रकरणातील जेरबंद आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.










