विश्वासघाताचा महाघोटाळा! शेतकऱ्यांचा साडेपाच कोटींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार

Spread the love

पुर्णेच्या एरंडेश्वरमधील घटना ;१०० ते १५० शेतकऱ्यांची फसवणूक; सुमारे साडेपाच कोटींची हळद, सोयाबीन, हरभरा,गहू व तूर घेऊन लंपास; दोघांविरुद्ध तक्रार दाखल

पूर्णा, ता. १७ (प्रतिनिधी) :

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा शेतमाल हडप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला वेळेवर व्यवहार करून विश्वास जिंकणाऱ्या भुसार व्यापाऱ्याने नंतर गावातील १०० ते १५० शेतकऱ्यांकडून सुमारे ६ हजार ८०० क्विंटल शेतमाल उचलला आणि पैशांची देयके न देता आपल्या मुलांसह फरार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरापर्यंत पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एरंडेश्वर गावातील शेख हमीद शेख सरू बालेसाब व  शेख सरू शेख बालेसाब हे मागील काही वर्षांपासून शेतमाल खरेदीचा व्यवसाय करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात वेळेवर पैसे देत त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तूर खरेदी करण्यास सुरुवात केली.गावातील शेतकऱ्यांकडून सुमारे  साडे पाच कोटी रुपये किंमतीचे १,०९६ क्विंटल हळद, ३,६३० क्विंटल सोयाबीन, २,००० क्विंटल हरभरा, ५७ क्विंटल गहू आणि ३५ क्विंटल तूर असा एकूण सुमारे ६,८०० क्विंटल शेतमाल उचलण्यात आला. माल घेतल्यानंतर “काही दिवसांत पैसे देतो”, “बाजारात तेजी-मंदी आहे” अशी कारणे देत वेळकाढूपणा करण्यात आला. काही दिवसांपासून ते दोघे बापलेक घरुन पसार झाल्यानंतर”शेतकऱ्यांना फसवणुकीची जाणीव होताच ,संतप्त शेतकऱ्यांनी थेट पूर्णा पोलीस ठाणे गाठून प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात १०० ते १५० शेतकरी आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले असून, लंपास करण्यात आलेल्या शेतमालाची किंमत सुमारे साडेपाच कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

या घटनेमुळे एरंडेश्वरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपी व्यापाऱ्याला तातडीने अटक करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी होत आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ठळक मुद्दे

  • १०० ते १५० शेतकरी फसवणुकीचे बळी
  • ६,८०० क्विंटल शेतमालाचा कथित अपहार
  • बाजारभावानुसार साडेपाच कोटींचा व्यवहार
  • भुसार व्यापारी मुलांसह फरार झाल्याचा आरोप
  • पूर्णा पोलिसांकडे सामूहिक तक्रार; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

You cannot copy content of this page