परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी १८२ अर्ज दाखल
निवडणुकीचा रणसंग्राम ;
परभणी/प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संचालकांच्या २१ जागांसाठी तब्बल १८२ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी १९ जूलै रोजी मतदान होणार आहे. तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. परभणी जिल्हा बँक संचालकांच्या २१ जागांकरीता निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. उमेदवारी अर्जांची छाननी २४ जून रोजी होणार आहे. तर वैध उमेदवारांची यादी २५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज २५ जून ते ९ जुलै या कालावधीत मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी आणी चिन्हवाटप १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. तर रविवारी(दि. १९ जुलै) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आणी मंगळवारी(दि. २० जुलै) मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून – १४ जागांसाठी ७६, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था – १ जागेसाठी ७ , इतर शेती संस्था – १ जागेसाठी ३०, महिला राखीव – २ जागांसाठी २०, अनुसूचित जाती अथवा जमाती – १ जागेसाठी १८, इतर मागासवर्ग -१ जागेसाठी १० आणी विमुक्त जाती व भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्ग – १ जागेसाठी २१ अशा एकूण २१ संचालकांच्या जागांसाठी १८२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
–विविध मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
प्राथमिक कृषी पतपुरवठा आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून सुरेश वरपूडकर आणि समशेर वरपूडकर यांचे अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर पालम तालुक्यातून तुषार दुधाटे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गंगाखेड तालुक्यातून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे दोन अर्ज, मानवत तालुक्यातील आकाश चोखट यांचे दोन अर्ज, पाथरी तालुक्यातून भावना नखाते यांचे दोन अर्ज, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व जुनेद खान दुर्रानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिंतूर तालुक्यातील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व गंगाधर बोर्डीकर यांचा अर्ज, सोनपेठ तालुक्यातून आमदार राजेश विटेकर, हिंगोली तालुक्यातील तानाजी मुटकुळे, गजानन घुगे, वसमत तालुक्यातून आमदार चंद्रकांत नवघरे, औंढा तालुक्यातील राजेश पाटील यांचे तीन अर्ज, कळमनुरी तालुक्यातील बालासाहेब मगर यांचे तीन अर्ज, सेनगाव तालुक्यातून रूपाली पाटील व दिग्विजय पाटील यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत. कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदार संघातून संतोष बोबडे, गणेश देशमुख, सुरेशराव देशमुख यांचे अर्ज दाखल झाले आहेत. इतर शेती संस्था मतदारसंघातून संजय देशमुख, समशेर वरपूडकर, विजयकुमार मोरे, विजय जामकर संतोष बोबडे, संजय देशमुख, शिवाजी भरोसे, शशिकांत वडकुते अशोक काकडे, सईद खान, अजित वरपूडकर आदींचे अर्ज दाखल झाले आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघातून रूपाली पाटील, मीना वरपूडकर, जयश्री जाधव, प्रेरणा वरपूडकर, भावना नखाते, भावना बोर्डीकर, करुणाबाई कुंडगीर, फरहाणा खान नसरीन, शीला काकडे आदींचे अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघातून प्रशास ठाकूर, मिलिंद सावंत, अतुल सरोदे, शोभा बोबडे आदींचे अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून स्वराजसिंह परिहार, सुमित परिहार, विशाल बुधवंत, करुणाबाई कुंडगीर, संगीता सानप, दत्तात्रय मांदळे, फैजल शेख आदींचे अर्ज दाखल झाले आहेत. आणि इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सचिन भोसले, भगवान वाघमारे, रामभाऊ घाटगे, अशोक काकडे आदींचे अर्ज दाखल झाले आहेत.
__________










