सरपंच महिलेच्या पतीला वाळुच्या टिप्परने चिरडले
पुर्णेतील संदलापुर येथिल घटना;संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवला;गावात तणावपूर्ण शांतता;पोलीसांचा फौजफाटा तैनात
पूर्णा,ता.१२(प्रतिनिधी)
अवैध वाळुची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने तालुक्यातील संदलापूरच्या महिला सरपंचांच्या पतीला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडल्याचे उघडकीस आले असून,या घटनेत त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित टिप्परला आग लावून पेटवून दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत चालकाला ताब्यात घेतले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती आहे.
पंडित बाळासाहेब मात्रे (वय ५५) रा.संदलापुर ता.पुर्णा असं त्या महिला सरपंचांच्या मयत पतीचे नाव आहे.मंगळवारी (दि.१२) सायं सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान पूर्णा पोलीसांच्या हद्दीतील संदलापूर गावाजवळील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या रेती भरून टिप्पर क्र. (एम.एच ४३ /यू /२८५०) हा गावामधून भरधाव वेगाने जात असताना पंडित म्हात्रे यांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की, पंडित मात्रे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतापाच्या भरात ग्रामस्थांनी अपघातग्रस्त टिप्परला आग लावून पेटवून दिले. या आगीत टिप्परची केबिन जळाले आहे.यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.ही घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ समाधान पाटील, ठाणेदार विलास गोबाडे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत टिप्पर चालकाला ताब्यात घेतले. मृत पंडित मात्रे यांचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय, परभणी येथे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेनंतर संदलापूर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरसीपी पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे.











