श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात उत्साहात आगमन

Spread the love

झिरोफाटा, भारतीकॅम्प परिसरात भक्तांकडून जल्लोषात स्वागत; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

पूर्णा, ता. ४ (प्रतिनिधी)
शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या ५७ व्या पालखी सोहळ्याचे शनिवारी परभणी जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले. पूर्णा तालुक्यातील जिल्हा सीमेवरील झिरोफाटा तसेच भारतीकॅम्प परिसरात भक्तगणांनी पालखीचे भव्य स्वागत केले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पुढील चार दिवस हा पालखी सोहळा जिल्ह्यात विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे.

आषाढी वारीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथून निघालेला श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून मजल-दरमजल करत शनिवारी (ता. ४) रोजी परभणी जिल्ह्यात दाखल झाला. झिरोफाटा येथे पालखीच्या स्वागतासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, राजकुमार लोहीया, संजय लोहीया, काशिनाथ काळबांडे, रितेश काळे, पिंटुभाऊ काळे, गजानन हिवरे, जगदीश जोगदंड, सुशिल गायकवाड, राजू सोळंके, ऋषीभाऊ मोरे, रामराजे भोसले, अनिल बुचाले, प्रदीप चापके, ज्ञानोबा काटकर,बालाजी काळबांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पालखीचे यथोचित स्वागत करण्यात आले.

यावेळी परिसरात “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावत मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. भारतीकॅम्प येथील गजानन महाराज मंदिर भक्त परिवाराच्या वतीने पालखीचे पूजन करून वारकऱ्यांसाठी चहापान व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.पालखी सोहळ्याचा मुक्काम त्रिधारा येथे असून रविवारी सकाळी पालखीचे परभणी शहरात आगमन होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

You cannot copy content of this page