रेल्वेत ‘हनीमून’चा घाट;व्हायरल व्हिडिओनंतर टिसी निलंबित,डेकोरेटरवर गुन्हा
वातानुकूलित डबा सजवला;समाजमाध्यमांवरील व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई
पुर्णा ता.९ (प्रतिनिधी) :
नवविवाहित जोडप्यासाठी नांदेड–मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्याला फुगे, फुलांच्या माळा, गुलाबी पडदे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी ‘हनीमून थीम’मध्ये सजविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ड्युटीवरील मुख्य तिकीट निरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आले असून, अनधिकृतपणे रेल्वे डब्यात प्रवेश करून सजावट करणाऱ्या खासगी डेकोरेशन कंपनीविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ७ जून २०२६ रोजी धावणाऱ्या ट्रेन क्रमांक ११००२ नांदेड–मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली होती. मात्र, सजावटीचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी सुरू केली.
माहितीनुसार, जालना येथील एका नवविवाहित जोडप्याने रेल्वे प्रवासातच हनिमूनचा अनोखा अनुभव घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन एका खासगी डेकोरेशन कंपनीशी संपर्क साधून फर्स्ट एसी डब्याची विशेष सजावट करून घेतली. डब्याच्या प्रवेशद्वारावर गुलाबी पडदे, छतावर लाल-पांढरे फुगे, खिडक्यांवर फुलांच्या माळा आणि बर्थवर गुलाबाच्या पाकळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण डब्याला ‘हनीमून सूट’चा लूक देण्यात आला होता.या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताच रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. चौकशीत रेल्वेच्या परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तींना डब्यात प्रवेश देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने संबंधित मुख्य तिकीट निरीक्षकाला निलंबित केले. तसेच सजावट करणाऱ्या डेकोरेशन कंपनीविरुद्ध रेल्वे कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाचा स्पष्ट इशारा
या घटनेनंतर नांदेड रेल्वे विभागाने स्पष्ट केले की, रेल्वेच्या कोणत्याही डब्यात खासगी स्वरूपाची सजावट करणे किंवा बाहेरील व्यक्तींना अधिकृत परवानगीशिवाय प्रवेश देणे हा सुरक्षा नियमांचा गंभीर भंग आहे. अशा प्रकारचे प्रकार पुन्हा आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.











