Parbhani; स्वाभिमानीचे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो
दिल्लीत जंतरमंतर येथे शेतकरी व विद्यार्थ्यांवरील कारवाईचा विरोध
परभणी,दि.22(प्रतिनिधी) :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. 22) केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात परभणीत जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणासंदर्भात केंद्रिय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी संसद भवनावर शांततेत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यावर कारवाई केल्याचा आरोप संघटनेने केला. याशिवाय शेतकरी संघटनांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील किसान घाट येथे आयोजित आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला.
या घटनांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परभणीत केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात किशोर ढगे, सय्यद कलीम, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, विकास भोपळे, गजानन दुघाणे, मुंजा लोडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.










