देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग लंपास

Spread the love

लॅपटॉपसह ५७ हजारांचा मुद्देमाल चोरीला; नांदेड लोहमार्ग पोलीसांत गुन्हा दाखल

पूर्णा, ता.१५ (प्रतिनिधी)

देवगिरी एक्सप्रेसने ठाणे ते पूर्णा असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची लाल रंगाची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेश बाजीराव यादव (वय ३२, रा. आदर्श कॉलनी, पूर्णा) हे दिनांक १३ मे २०२६ रोजी देवगिरी एक्सप्रेसच्या ए-३ कोचमधील बर्थ क्रमांक ५१ वरून ठाणे ते पूर्णा असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली. सकाळी सुमारे ६.३० वाजता जालना रेल्वे स्थानकावर जाग आल्यानंतर त्यांच्या सीटखाली ठेवलेली लाल रंगाची ट्रॉली बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये डेल कंपनीचा लॅटीट्युड लॅपटॉप, माउस, चार्जर, रोख ७ हजार रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच एसबीआय, एचडीएफसी, डीबीएस आणि आयसीआयसीआय बँकेची एटीएम कार्डे व कपडे असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

फिर्यादी यांनी पूर्णा पोलीस चौकी येथे लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शून्य क्रमांक ०४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर घटना जालना रेल्वे स्थानक हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी प्रकरण रेल्वे पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे वर्ग करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page