नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी परभणीत ABVPचे निदर्शने

Spread the love

केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष व वेळबद्ध चौकशीची मागणी

       परभणी,दि.13(प्रतिनिधी) :   अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( परभणीच्या वतीने नीट-यूजी 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरण, परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले.
      यावेळी अभाविपने नीट-यूजी 2026 परीक्षेशी संबंधित समोर येत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. विविध माध्यमे, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) तसेच तपास यंत्रणांकडून समोर येणार्‍या माहितींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या मनात परीक्षा व्यवस्थेच्या विश्‍वासार्हतेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याचे अभाविपने म्हटले.

अभाविपच्या मते, परीक्षा होण्यापूर्वी प्रश्‍नपत्रिका अथवा संबंधित माहिती काही व्यक्तींपर्यंत पोहोचत असेल, तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवरील आघात नसून वर्षभर मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अन्याय आहे. 2024 मध्येही अशा घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा अशी परिस्थिती निर्माण होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले.
या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी परीक्षा माफिया, संबंधित व्यक्ती आणि सहकार्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय परीक्षा संस्थेने संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवून विद्यार्थ्यांना आणि पालकांना वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशीही मागणी करण्यात आली.

कठोर कारवाई होणे आवश्यक ….
यावेळी अभाविपचे देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर नीटसारख्या परीक्षांना सामोरे जातात. मात्र पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पारदर्शकता ठेवून विद्यार्थ्यांचा विश्‍वास पुन्हा निर्माण करावा. तसेच विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता संयम राखून पुढील परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. अभाविप विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा निर्धार आंदोलनात व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page